Revelation of John 16

1मी परमपवित्रस्थानातून एक मोठी ‘वाणी’ ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा आणि देवाच्या रागाच्या या सात वाट्या पृथ्वीवर ओता.”

2मग पहिला देवदूत गेला आणि त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली आणि ज्या लोकांवर त्या पशूचे चिन्ह होते व जे त्याच्या मूर्तीला नमन करीत असत त्यांना अतिशय कुरूप आणि त्रासदायक फोड आले.

3नंतर, दुसर्‍या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली आणि त्याचे मरण पावलेल्या मनुष्याच्या रक्तासारखे रक्त झाले आणि समुद्रात जगणारे सर्व जिव मरण पावले.

4तिसर्‍या देवदूताने आपली वाटी नद्यांवर व पाण्याच्या झर्‍यांवर ओतली, “आणि त्यांचे रक्त झाले” 5आणि माझ्या कानी आले की, जलाशयांचा देवदूत म्हणाला,

‘तू’ ‘जो पवित्र आहेस’ आणि होतास तो तू नीतिमान आहेस,
कारण तू असा न्याय केलास.
6कारण त्यांनी पवित्रजनांचे आणि संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले,’ आणि तू ‘त्यांना रक्त प्यायला’ दिलेस;
कारण ते याच लायकीचे आहेत.

7वेदीने उत्तर दिले, ते मी ऐकले की,

‘हो, हे सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत.’

8चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि त्यास लोकांस अग्नीने जाळून टाकण्याची परवानगी देण्यात आली होती. 9लोक भयंकर उष्णतेने जळाले व त्यांनी या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली आणि त्यास गौरव द्यायला त्यांनी पश्चात्ताप केला नाही.

10पाचव्या देवदूताने आपली वाटी त्या पशूच्या राजासनावर ओतली आणि त्याचे राज्य ‘अंधकारमय झाले,’ आणि त्या क्लेशांत लोकांनी आपल्या जीभा चावल्या; 11त्यांनी आपल्या क्लेशांमुळे आणि आपल्या फोडांमुळे ‘स्वर्गीय देवाची’ निंदा केली आणि आपल्या कृतींचा पश्चात्ताप केला नाही.

12सहाव्या देवदूताने आपली वाटी महान फरात नदीवर ओतली आणि पूर्वेकडील राजांचा मार्ग तयार व्हावा म्हणून तिचे ‘पाणी आटवले गेले.’

13आणि मी बघितले की, त्या अजगराच्या मुखातून, त्या पशूच्या मुखातून आणि त्या खोट्या संदेष्ट्यांच्या मुखातून ‘बेडकांसारखे’ तीन अशुद्ध आत्मे बाहेर आले. 14कारण हे चमत्कार करणारे दुष्ट आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या, त्या महान दिवसाच्या लढाईसाठी सर्व जगातल्या राजांना एकत्र जमवायला त्यांच्याकडे जात आहेत.

15(‘पाहा, मी चोरासारखा येतो; जो जागृत राहतो आणि आपली वस्त्रे संभाळतो तो धन्य होय! नाही तर, तो उघडा फिरेल आणि ते त्याची लज्जा पाहतील’)

16आणि त्यांनी त्यांना हर्मगिदोन असे इब्री भाषेत नाव असलेल्या एका ठिकाणी एकत्र जमवले.

17सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली व परमेश्वराच्या भवनामधून, राजासनाकडून एक मोठा आवाज आला; तो म्हणाला, “झाले.” 18आणि विजांचे लखलखाट, आवाज व गडगडाट होऊन मोठा भूकंप झाला, ‘पृथ्वीवर’ लोक ‘झाल्यापासून’ कधी झाला नव्हता इतका मोठा भूकंप झाला, 19त्या महान नगरीचे तीन भाग झाले; राष्ट्रांची नगरे पडली आणि ती महान बाबेल, तिला त्याच्या कोपाच्या संतापाचा द्राक्षारसाचा प्याला द्यावा, म्हणून देवासमोर स्मरणात आणली गेली.

20आणि प्रत्येक बेट पळून गेले व डोंगर कोठेच आढळले नाहीत. आणि एक मण वजनाच्या ‘मोठ्या गारा’ आकाशातून खाली लोकांवर पडल्या; आणि त्या गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्यांची पीडा फार मोठी होती.

21

Copyright information for MarULB